राज्य वखार महामंडळाच्या कनिष्ठ साठा अधिकाऱ्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

वाशीम : पोलीसनामा ऑनलाईन – वाशीम येथील राज्य वखार महामंडळाच्या कनिष्ठ साठा अधिकाऱ्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. यानंतर वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नरेंद्र गोविंदराव सावरकर (वय 37) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाशीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नरेंद्र सावरकर हे वाशीम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालयात नोकरीस आहेत. यातील तक्रारदार यांच्या वेअर हाऊसला जमा केलेले 103 किलो धान्य हे नरेंद्र यांनी कमी दाखविले होते.

ही बाब तक्रारदार यांनी नरेंद्र यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सुधारित 103 किलोची नवीन पावती देण्यासाठी नरेंद्र यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी तक्रारदार यांनी अमरावती लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

आज 4 हजार रुपयांची लाच घेताना नरेंद्र यांना वाशीम एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम विभागाचे उपअधीक्षक एस. व्ही. शेळके, एएसआय परळकर, विनोद,राहुल, नाविद शेख यांच्या पथकाने केली.