लॉटरी चालकाकडून २० हजाराचा पहिला हप्‍ता घेणारे दोन पोलिस जाळयात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉटरी चालकाकडून २० हजार रूपयाचा पहिला हप्‍ता लाच म्हणुन घेणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलस उपनिरीक्षक उमेश सेवकराव गवई (४७) आणि पोलिस नाईक बाळु सुधाकर कुटे (३३) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. गवई आणि कुटे हे दोघे नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार हे लॉटरीच्या व्यवसायात आहेत. त्यांना लॉटरीचा व्यवसाय सुरू करावयाचा होता. त्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक गवई आणि पोलिस नाईक कुटे यांनी त्यांच्याकडे ३० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. पहिला हप्‍ता म्हणुन २० हजार रूपयाची लाच सहाय्यक उपनिरीक्षक गवई यांनी सरकारी पंचासमक्ष स्विकारली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस उपाधिक्षक आफळे, पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, कर्मचारी कदम, सुवारे, पालवे, चव्हाण, सुमडा, महिला कर्मचारी मांजरेकर आणि चालक दोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे अधिक तपास करीत आहेत.