1500 रुपयांची लाच स्विकारताना शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बालसंगोपन रजा मंजुर करण्यासाठी 1500 हजार रुपयांची लाच स्विकारातना प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शैक्षणीक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चेतन भिका वानखेडे (वय- 42 वर्षे, रा- प्लॉट नं.12, मोची नगर, गणपती मंदीराजवळ, धरणगाव, ता.धरणगाव, जि.जळगाव) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील तक्रारदार यांची पत्नी शिक्षिका आहेत. त्यांच्या पत्नीची बालसंगोपन रजा मंजुर करण्यासाठी चेतन वानखेडे याने 1500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत अधिकाऱ्यानी पंचासमक्ष पडताळणी केली असता चेतन वानखेडे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. चेतन वानखेडे याला पंचासमक्ष लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit :  Policenama.com