80 हजाराची लाच घेणारा गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

प्रतिनियुक्‍तीवर होता गुन्हे शाखेत नियुक्‍तीस

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हयात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे 1 लाख 35 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 80 हजार रूपयाची लाच स्वतःच्या मारूती वॅगनार कारमध्ये स्विकारणारा ठाणे गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. नियुक्‍तीस मुख्यालयात असलेल्या पोलिस हवालदारास प्रतिनियुक्‍तीवर गुन्हे शाखेत नियुक्‍त केले होते. प्रतिनियुक्‍तीवर असताना पोलिस हवालदाराने भलताच उद्योग केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस हवालदार रामदास देवराव मिसाळ (46, बक्‍कल नं. 1072, नेमणुक : मुख्यालय, सध्या प्रतिनियुक्‍तीवर ठाणे गुन्हे शाखा, युनिट-4) असे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराचा पुर्वीच्या चोरीच्या गुन्हयात सहभाग आहे. त्यात अटक न करण्यासाठी पोलिस हवालदार रामदास मिसाळ यांनी त्यांच्याकडे 1 लाख 35 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 80 हजार रूपयामध्ये सेटलमेंट झाली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे दि. 1 एप्रिल रोजी प्राप्‍त झालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये हवालदार मिसाळ हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यामुळे अ‍ॅटी करप्शन विभागाने काल (दि. 2 एप्रिल) रोजी सायंकाळी सापळा रचला. त्यावेळी पोलिस हवालदार मिसाळ यांनी सरकारची पंचासमक्ष त्यांच्या मारूती वॅगनर (कार नंबर एमएच 05, सीए 2141) कारमध्ये 80 हजार रूपयाची लाच स्विकारली. हवालदार मिसाळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तिनियुक्‍तीवर गुन्हे शाखेत असलेल्या पोलिस हवालदाराने चक्‍क 80 हजार रूपयाची लाच स्विकारल्याने पोलिस वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक आजगांवकर, पोलिस हवालदार भावसार, महिला हवालदार पाटील, मदने, पोलिस नाईक खाबडे, चालक सहाय्यक फौजदार कदम यांच्या पथकाने केली आहे. अ‍ॅन्टी करप्शन विभागाने काल (दि. 2 एप्रिल) रात्री ही कारवाई केली आहे.