महाविद्यालयाच्या महिला प्राचार्या, लिपीक २० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – संस्थेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून शिक्षकाचा दोन महिन्यापासूनचा बंद केलेला पगार परत चालु करण्यासाठी २० हजार रूपयाची लाच घेणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला प्राचार्या आणि कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

प्राचार्या गिता यशवंत सादूल (४४) आणि कनिष्ठ लिपीक आंबादास पिंटप्पा रच्चा (५३, दोघेही नेमणुकीस सौ भू.म. पुल्‍ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, साखरपेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ४७ वर्षीय शिक्षकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार शिक्षक हे सोलापूरातील साखरपेठ येथील सौ भू.म. पुल्‍ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. प्राचार्या गिता सादूल यांनी तक्रारदार शिक्षकाकडे संस्थेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी २० हजार रूपयाये मागितले होते. तक्रारदाराने त्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे प्राचार्या सादूल यांनी तक्रारदाराचा दोन महिन्यांपासुन पगार बंद केला होता. तो पगार चालु करण्यासाठी प्राचार्या सादूल यांनी २० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

दरम्यान, तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, तक्रारदाराकडून लाच म्हणून २ हजार रूपये घेण्यात आले. राहिलेले १८ हजार रूपये कनिष्ठ लिपीक रच्चा यांनी सरकारी पंचासमक्ष स्विकारले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने प्राचार्या आणि कनिष्ठ लिपीक यांना अटक केली आहे. पोलिस उपाधीक्षक अरूण देवकर, पोलिस निरीक्षक कविता मुसळे, जगदीश भोपळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली आहे.

Loading...
You might also like