पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर अपघात, कंटेनरला बस धडकली, बस चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर अचानक बंद पडलेल्या कंटेनरला खासगी बसने मागून दिलेल्या भीषण धडकेमुळे झालेल्या अपघातात बस चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. कामशेतजवळ बौर गावच्या हद्दीत हा अपघात घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्या सुमारास कामशेतजवळील बौर गावच्या हद्दीत चेन्नईकडुन भिवंडीच्या दिशेने निघालेला कंटेनर (एचआर ५५ एडी ३९२८) चुकीच्या लेनमध्ये असताना अचानक बंद पडला. यावेळी मागुन वेगाने येणाऱ्या अक्कलकोट – मुंबई या लक्झरी बसने (एमएच ०३ सीपी ९९०३) कंटेनरला मागुन जोरदार धडक दिली.

या अपघातात बस चालक रमेश संजय कबाडे (वय २४, रा. माढा, सोलापूर) हा ठार झाला. तर बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला. कंटेनर चालकाचे नाव मौहमद सइद खान (रा. अब्दुल्ला नगर, शहाबाद, हरियाना) आहे. या अपघातानंतर जखमींना सोमाटणे फाटा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामशेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/