पुण्यातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते १०० टक्के सील करण्याच्या सूचना, जाणून घ्या

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही वाढ शहराच्या गुलटेकडी ते संगम ब्रीज आरटीओ कार्यालया दरम्यानच्या एरियामध्ये आणि कोंढव्याच्या एका भागात अधिक असून हा भाग सील करण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती राहील्यास टप्प्याटप्प्याने संपुर्ण शहर सील करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात गुलटेकडी ते आरटीओ पर्यंतचे सर्व रस्ते व अंतर्गत रस्ते बंद करण्यात येणार आहेत. दिल्लीतील मरकजशी संबधित रुग्णांचे प्रमाण शहरात ३० टक्क्यांहून अधिक असून अद्याप काहीजणांनी तपासणी करून घेतलेली नाही. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झाल्याचे प्रमाण वाढत असून सील करण्यात आलेल्या भागातील नागरिकांनी घरातच राहून आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेर पडणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसंाना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

map

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले, की शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. गुणाकार पद्धतीने हा संसर्ग होत असून गुलटेकडी ते आरटीओ कार्यालया दरम्यानच्या परिसरात शहरातील सर्वाधीक रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३० रुग्ण हे दिल्लीतील मरकजशी संबधित आहेत. तसेच कोंढव्यातील एका भागातही मरकजशी संबधितचांचे प्रमाण अधिक आहे. येथे आल्यानंतर ते ज्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस येउ लागले आहे. यामुळे गुलटेकडी ते आरटीओ कार्यालया दरम्यानच्या परिसरातील मध्यवर्ती पेठांचा व कोंढव्याचा गुगलवरून नकाशा तयार करण्यात आला आहे. या मॅपनुसार मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते १०० टक्के सील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांनी पुढील काही दिवस शक्यतो घराबाहेर पडू नये. किंबहुना घरामध्ये असतानाही मास्क वापरावा. हेल्थ गाईडलाईननुसार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा परिस्थिती बिघडल्यास टप्प्याटप्प्याने संपुर्ण शहर सील करावे लागेल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.

ते म्हणाले, की साथीच्या दुसर्‍या टप्प्यात प्रवेश केल्याने शहरात पुर्वी कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने लागण झालेल्यांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घाबरुन जायचे कारण नाही. प्रशासनाने जवळपास २५ हजार बेडस्ची तयारी केली आहे. नायडू रुग्णालयात आता बेडस् शिल्लक नसून बोपोडी, धायरीतील लायुगडे रुग्णालयात त्यानंतर लवळेच्या सिम्बायोसीस आयसोलेशनमधील २०० बेडस्ची सुविधा केली आहे. त्यामुळे संख्या वाढली तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. अगदी गरिबातील गरिब रुग्णावर प्रशासनाकडून इलाज केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढू नये, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे.

चौकट

अभ्यासाअंतीच हे दोन भाग सील करण्याचा निर्णय

कोरोनाचे रुग्ण कुठे आढळतात याचे अगदी इमारत, गल्ली याचे मॉनिटरींग करण्यात येत होते. त्यानुसार अभ्यास करण्यात आला. यामध्ये मध्यवर्ती जुन्या पेठेच्या भागात व कोंढव्यातील एका भागात सर्वाधीक रुग्ण आढळले आहेत. या अभ्यासानंतरच हे दोन्ही भाग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी बहुतांश रुग्ण हे मरकजशी संपर्कात आले आहेत. मरकजच्या कार्यक्रमाच्यावेळी जुन्या दिल्लीत ङ्गिरायला गेलेल्या शहरातील नागरिकांचीही यादी तयार करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, असे शेखर गायकवाड यांनी नमूद केले.

चौकट

मरकजहून आलेल्या व त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे

दिल्लीतील मरकज कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यां अनेक नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आला आहे. यापैकी बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कार्यक्रमानंतर परतल्यानंतर त्यांनी येथे ज्या नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत, त्यातून संक्रमित झालेले नवीन रुग्ण पुढे येत आहेत. मरकजच्या कार्यक्रमाला गेलेले अद्यापही काहीजण बाहेर आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतू यापैकी बरेचजण अद्याप संपर्कात आलेले नाहीत. मरकजहून आलेल्या नागरिकांनी व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन आज पुन्हा एकदा शेखर गायकवाड यांनी केले आहे.