शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात…., शिवसेनेचं अन् राष्ट्रवादीचं जमलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली भेट राज्याला नवीन सत्ता समीकरण देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. संजय राऊत यांनी दहा मिनिटे शरद पवारांची सिल्व्हर ओकला जाऊन चर्चा केली. यानंतर दोघेही बाहेर आले शरद पवारांनी मात्र यावेळी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

संजय राऊत यांना मात्र प्रसार माध्यमांनी घेराव घातल्याने या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी शरद पवारांनी राज्यात असलेल्या अस्थिर वातावरणावर चिंता व्यक्त केल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. सत्तास्थापनेबाबत काही भाष्य करणे यावेळी संजय राऊत यांनी टाळले.

संजय राऊतांनी गेल्या 31 ऑक्टोबरला शरद पवारांची भेट घेतली होती. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. अधिक संख्याबळ येऊन देखील भाजपने अद्याप सत्ता स्थापन केलेली नाही कारण भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही आणि त्यासाठी भाजपला शिवसेनेला सोबत घ्यावे लागणार आहे.

राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार का नवीन एखादे सत्तासमीकरण पहायला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे शरद पवार काय निर्णय घेतात यावरून राज्यातील सत्ता समीकरण ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून फोनवरून चर्चा झाली आहे अशी माहिती सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे सेना आणि राष्ट्रवादीचं जमलं काय असा प्रश्न निर्माण झाला असून आगामी 48 तासाच्या आत नवीन सरकार राज्यात येणे अपेक्षित आहे.

Visit : Policenama.com