अहमदनगर : शहरात लोकवर्गणीतून ‘सीसीटीव्ही’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर शहरातील मूलभूत सोयीसुविधा व नागरी प्रश्नांसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या येथील जागरूक नागरिक मंचाने आता शहरातील प्रमुख चौकांत ‘सीसीटीव्ही’ बसविले आहेत. तसेच येत्या २० डिसेंबरला कल्याण रस्त्यावरील नेप्ती चौकातही अशी सुविधा केली जाणार आहे.

वाढते अपघात तसेच वाहने आणि मंगळसूत्र वा दागिने चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा तसेच वाहतूक शिस्तीचे पालन होताना पोलिसांना वाहतूक नियोजन सोपे जावे म्हणून जागरूक नागरिक मंचाने मागच्या वर्षी दिल्ली गेट वेस परिसरात स्वखर्चातून ‘सीसीटीव्ही’ बसवले आहेत. याच पद्धतीने स्वखर्चासह दानशूरांच्या मदतीने नुकतीच अशी सुविधा सक्कर चौकातही केली गेली आहे.

येत्या २० रोजी येथील पंडीत दीनदयाळ पतसंस्थेच्या मदतीने नेप्ती चौकात ही सुविधा होणार असून, नंतर नव्या वर्षात २० जानेवारी २०२० रोजी येथील ज्येष्ठ नागरिक निर्मला भंडारी यांच्या मदतीने स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकातही ही सुविधा होणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने शहरातील अन्य प्रमुख चौकांतही अशी सुविधा करण्याचे नियोजन आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/