बारामतीत आजोबा-नातू यांच्यातील ‘वाद’ निवळला !

बारामती, पोलीसनामा ऑनलाईन : दि. 16 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेऊन कानउघडणी केली. त्यामुळे पवार कुटुंबात मागील काही दिवसांपासून वादंग सुरू होता. पण, आता वाद निवळला आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. नुकतीच बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबाची बैठक पार पडली. यावेळी आजोबा-नातवाच्या वादंगावर अखेर पडदा पडला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फोनवरून चर्चा झाली. वाद निवळल्याने शरद पवार पुण्यातून मुंबईला दाखल झाले. तर बैठक आवरून बारामतीहून अजिप पवार हे पुण्याला रवाना झाले. ते त्यानंतर मुंबईत येणार आहे, अशी माहिती दिली आहे.

पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी रात्री काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक पार पडली.

यावेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. यावेळी खुद्द अजित पवार उपस्थित होते. तसेच अजित, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली आहे.

पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे आजोबा शरद पवार यांनी खडसावले.त्यामुळे नाराज झालेल्या पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबीयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी राजकीय वातावरण तापलंय. भाजपने सीबीआय चौकशीची मागणी करून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर, अशात पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांनी अशी मागणी केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्याच्या वर्तुळात खळबळ माजली.
पार्थ पवार एवढ्यावर न थांबता त्यांनी राम मंदिर भूमिपूजनावर ट्वीट करून जय श्रीरामचा नारा दिला.

पार्थ यांच्या या भूमिकेची माध्यमांचा चांगली चर्चा रंगली होती. त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारले असता, ’मी माझ्या नातवाच्या भूमिकेला काडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे’ असे म्हणून पार्थ यांला सुनावले होते. शरद पवार यांनी जाहीरपणे आपल्या नातवावर टीका केल्याने एकच खळबळ माजली.त्यानंतर पार्थ नाराज आहे, अशी चर्चा सुरू झाली.