‘त्यासाठी’ अजित पवार आणि सुप्रिया सुळे माझ्या घरी आले होते : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात इंदापूर विधानसभा मतदार संघ येतो. बारामतीची निवडणूक आणि आघाडी धर्मासह इतर विषयांवर चर्चा करण्याकरिता खा. सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील माझ्या घरी भेटायला आले होते. त्यांनी आगामी विधानसभेमध्ये आघाडी धर्म पाळू, असा शब्द दिल्याने जिल्हयात काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे. इंदापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे ज्यावेळी भेटीसाठी आले होते त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. इंदापूर विधानसभेबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे निर्णय घेतील. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्याला शब्द दिला असल्याने काँग्रेसचे सर्वजण जिल्हयात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणार आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना संपुर्ण ताकतीनिशी साथ देतील असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्र येवुन लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहेत. दरम्यान, पुन्हा आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.