घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला ‘शहाणपण’ म्हणत नाहीत, अजित पवारांचा भाजपावर ‘ घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करून कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची एकजुटीची लढाई लढत असताना, अशा आंदोलनातून या लढाईचे अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने ‘काळे झेंडे’ सारखे आंदोलन करून महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करू नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नये. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी भाजपला दिला.