दौंडमधील सर्व 42 कोरोना बाधित पोलिसांची ‘कोरोना’वर मात

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून पोलीस दलात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूने आपल्या विळख्यात घेतले असून पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. दौंड शहरातील राज्या राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) 27 व इंडियन रिझर्व्ह बटालियनेचे (आयआरबी) 15 असे एकूण 42 कोरोनाबाधित पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक 7 च्या विविध तुकड्या मुंबई येथील शिवाजीनगर व अन्य भागात बंदोबस्त पूर्ण करून परत आल्या होत्या. त्यानंतर त्यापैकी 27 जणांना 1 ते 16 मे दरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. पुणे येथे उपचार घेतल्यानंतर सर्व 27 जण बरे झाले आहेत, अशी माहिती गटाच्या अधिकारी डॉ. वैशाली खान यांनी दिली. इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) मुख्यालय कोल्हापूर येथे असून दौंड येथील राज्य राखीव दलाच्या जागेत आयआरबीच्या तुकड्या स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

मुंबई येथील राजभवनावरील बंदोबस्त करून परतलेल्या 111 जणांच्या तुकडीतील 16 पोलिसांना 16 ते 20 मे दरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. सर्व 16 कोरोनाबाधित पोलीस बरे झाल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. दौंड तालुक्यात 29 एप्रिल ते 2 जून दरम्यान 52 जणांना कोरोनाची बाधा झाली व त्यापैकी उपचार घेऊन 46 जण बरे झाले आहेत. दौंड शहरातील कोरोनाबाधित 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचा एक मुलगा आणि एक नातेवाईक आणि कुरकुंभ येथे कामाला असलेला एक तरुण अशा तीन जणांवर उपचार सुरु आहेत.