भाजपचे सगळे ‘चौकीदार’ चोर… ‘या’ नेत्याने केला घणाघात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदाराच्या मुद्द्यावरून भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अरूण जेटली, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपचे सगळे चौकीदार चोर आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ट्विटच्या माध्यमातून राहुल यांनी टीका केली आहे. भाजपचे सगळे चौकीदार चोर आहेत असं म्हणत त्यांनी नमो, अरूण जेटली, राजनाथ सिंह अशी नावं लिहिली आहेत. त्यापुढे काही रिकाम्या ओळीही सोडल्या आहेत.

भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी १८०० कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला वाटले असा आरोप काँग्रेसने केला आहे. याच संदर्भातील एक बातमी राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सगळे चौकीदार चोर आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताच्या आधारे येडियुरप्पांवर हे आरोप काँग्रेसने केले आहेत. शिवाय, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

राहुल गांधींनी राफेवरून पंतप्रधानांवर निशाणा साधताना अनेकदा त्यांचा उल्लेख चौकीदार म्हणून केला आहे. सामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून अनिल अंबानींचे खिसे भरले असाही आरोपही काँग्रेसने वारंवार केला आहे. मोदींवर झालेल्या टीकेनंतर मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे पंतप्रधान म्हणून नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणांमधून वारंवार केली आहे. याचाच आधार घेत काँग्रेसने चौकीदार चोर है अशी मोहिमच राबवली.

राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या या मोहिमेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून ‘मै भी चौकीदार’ ही मोहिम सुरू केली. यानंतर त्यांना फाॅलो करत सगळ्याच भाजप नेत्यांनी आपल्या नावापुढे आपल्या नावापुढे ‘मै भी चौकीदार’ असं लिहीत ट्विटरवरील नाव बदललं. याच मुद्द्यावरून आता भाजपचे सगळे चौकीदार चोर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.