गडचिरोलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांकडून स्फोट

गडचिरोली : वृत्तसंस्था – गडचिरोलीतल्या एटापल्ली येथील गट्टा भागात निवडणूक पथकाच्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे वृत्त आहे. या स्फोटामध्ये एक जवान जखमी झाला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. उद्या (दि. ११) येथे पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीमध्ये मतदानाची तयारी करण्यासाठी निघालेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गावर बुधवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या १९१ बटालिअनच्या जवानांचे पथक होते. दरम्यान, या स्फोटात एक जवान जखमी झाला आहे.

एका सायकलवर आयईडी स्फोटकं लावून नियोजितरित्या हा स्फोट घडवून आला. कालच छत्तीसगडमध्ये भाजपा आमदाराच्या ताफ्याच्या मार्गात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण भागात रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.