‘या’ मतदारसंघात कोणीही येवो, ‘जागा’महायुतीच्या पारड्यात जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात अनेक मतदारसंघामध्ये भाजपा व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि त्यांचे बंडखोर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांपैकी कोणीही विजयी झाले तरी ती जागा महायुतीच्या पराड्यात जाणार असल्याचे दिसून येते. देवगड, कणकवली मतदारसंघात नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे उमेदवार नितेश राणे आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत यांच्यात लढत होत आहे.

या दोघांपैकी कोणीही निवडून आले तरी ती जागा महायुतीच्या पराड्यात जाणार आहे. तशीच स्थिती सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघात दिसून येते. भाजपावासी झालेले काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे भाजपाकडून उभे आहेत तर, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शेखर गोरे हे लढत देत आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट न घेता अपक्ष निवडणूक लढवत आहेत़ या तिहेरी लढतीत कोणतेही गोरे निवडून आले तरी ती जागा महायुतीकडे जाणार आहे़

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात विद्यमान आमदार अपक्ष रवि राणा विरुद्ध शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्यात लढत होते आहे. राणा निवडून आले तरी ते भाजपाला पाठिंबा देतील आणि शिवसेनेच्या बंड निवडून आल्या तर ती जागा महायुतीकडेच राहणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघात रश्मी बागल विरुद्ध अपक्ष नारायण पाटील आणि संजय शिंदे असा तिरंगी सामना आहे. तेथे कोणीही जिंकले तरी ते युतीबरोबरच राहील असे सांगितले जाते.
सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि काँग्रेसचे बंडखोर प्रभाकर पालोदकर यांच्यापैकी कोणी विजयी झाले तरी युतीचीच जागा राहील.

औरंगाबाद पश्चिम मधून विद्यमान आमदार शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपाचे बंडखोर राजू शिंदे यांच्यापैकी कोणीही जिंकले तरी जागा महायुतीकडे राहणार आहे. अशीच आणखी ३० मतदारसंघात स्थिती आहे. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळण्यास अडचण येणार नाही.

Visit : Policenama.com