बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का, विनायक मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कोंडीने राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही अशी दुहेरी भूमीका घेणाऱ्या शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. भाजप श्रेष्ठींनी शिवसंग्रामची भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर मेटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादीला असल्याचे त्यांनी जाहीर करून पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे.

पंकजा मुंडे या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दुष्काळ, चारा छावण्या मंजुरी, दुष्काळी उपाय योजनाची कामे, यामध्ये टाळाटाळ करून टोकाला जावून विरोध करत आहेत. त्यांमुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्रात भाजपासोबत राहणार आहे मात्र बिडमध्ये नाही. अशी जाहीर भूमिका मेटेंनी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंची डोकेदुखी आणखी वाढली आहे. मात्र, मेटे यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे मतदानाचा किती फटका बसेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या असहकार्य भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडून उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही. कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.