मौजे अन् हौसेपायी या पट्टयांनी अहमदनगरहून पुण्यात केल्या चोर्‍या, साडेचार लाखाच्या दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हौस भागविण्यासाठी पार्किंग केलेली वाहने चोरून त्याद्वारे मौजमजा करणार्‍या दोन तरुणांना भारती विद्यापीठ पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून साडे चार लाखांच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

विशाल संतोष खैर (वय 19) व राहुल भिमा कांबळे (वय 20, दोघेही रा. विट्ठभट्टी धाऊरवाडी रोड. ता. खंडाळा, जि. सातारा. मुळ. कळंब. ता. अकोला. जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोघेही मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून, पुण्यात गेल्या काही वर्षांपासून आहेत. मिळेल ते काम करत ते दुचाकी चोरत होते. त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याचे तपासात सांगितले आहे. शहरातून वाहने चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज चार ते पाच वाहने चोरीला जात आहेत. मात्र, याला रोखण्यात पोलीसांना अपयश येत आहे. त्यातही या गुन्ह्यांची उकल करण्यातही पोलीस कमी पडत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, फरारी तसेच पाहिजे आरोपींचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी उज्वल मोकाशी आणि शिवा गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज कोंढवा रस्त्यावरील ब्रिज खाली दोघे उभारले असून, त्यांच्याकडे दुचाकीची गाडी आहे. त्यानुसार, परिमंडळ दोनचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, वरिष्ठ निरीक्षक वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी विनोद भांडलकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, प्रणव सपकाळ आणि त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी शहराच्या इतर भागातूनही दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 8 आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 6 अशा एकूण 12 दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून 4 लाख 30 हजार रुपयांच्या 12 दुचाकी चोरल्या आहेत.

Visit : Policenama.com