महाराष्ट्रात भाजपने सेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता ; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाला ((JDU) केवळ 40 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला (BJP) 74 जागा मिळाल्या आहेत. जदयुपेक्षा भाजपच्या जागा जास्त असल्याने भाजप नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी देणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. भाजपच्या काही नेत्यांनी केलेल्या उलटसुलट विधानांमुळे यात भर पडली होती. मात्र, भाजपने नितीश यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवले आहे. बिहारमधील घडामोडींवरून आता महाराष्ट्रात टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darkear) यांनी बिहारच्या निमित्ताने महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींना उजाळा देत शिवसेनेवर तोफ डागली आहे. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने शब्द पाळला असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. बिहारमध्ये भाजपने आधीच जाहीर केल्यानुसार नितीश मुख्यमंत्री होत आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता, असे दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती हे खरे आहे, पण भाजपने तसा कोणताही शब्द दिला नव्हता, असे ते म्हणाले.

बिहारमध्ये भाजपच्या दोन आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, बिहार हे मोठे राज्य असल्यामुळे पक्षाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामागे दुसरे कुठलेही कारण नाही. महिलांचे प्रश्न समजून घेता यावेत म्हणून महिलेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.