जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप नेते वसीम बारी यांच्यावर हल्ला, वडील आणि भावासह तिघांची हत्या

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मिरमधील बांडीपोरा जिल्ह्यात बुधवारी (दि.8) दहशतवाद्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. बुधवारी सायंकाळी उत्तर काश्मीरमधील बांडीपोरा येथे भाजप नेत्याच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडील वसीम अहमद आणि भाऊ उमर शेख यांचा मृत्यू झाला.

हा हल्ला बांडीपोरा पोलीस स्टेशन जवळील मुसलीमाबाद खालूसा येथील भाजप नेत्याच्या घरावर झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिन्ही पिता-पुत्रांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. याची पुष्टी करताच काश्मीर शाखेचे प्रभारी मंजूर भट यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरात दहशतवाद्यांचा शोध सरु केला आहे. तसेच परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.