‘कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक’, आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे ती फसवी आहे. इतकेच नाही तर ती राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट फसवणूक करणारी आहे असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, “सरकारनं दिलेली कर्जमाफी 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखांपर्यंत आहे. एवढीच मर्यादा आहे. त्यामुळे ती सरसकट ठरत नाही. ती किमान 30 ऑक्टोबर 2019 तरी असायला हवी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2001 पासून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवली होती. या योजनेत सुमारे 54 लाख शेतकरी लाभार्थी ठरले होते. त्यामुळे नव्या शेतकरी योजनेत किती लाभार्थी ठरतील याबाबत शंका आहे, म्हणून ही योजना सरसकट आहे असं म्हणता येणार नाही. ही सरसकट फसवणूक आहे” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे सरकारची महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान योजना लागू करताना थकित कर्जाची मर्यादा 2 लाख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 2 लाखांपेक्षा 5 हजार रुपये जरी कर्ज जास्त असेल तर असं कर्ज असणारा शेतकरी यास पात्र ठरत नाही. पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकित असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्यांची रक्कम 2 लाखांपर्यंत आहे अशी अट असल्यानं विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी ज्याचे कर्ज पुनर्गठित झाले आहे व 2 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार ? त्यामुळे ही योजना सरसकट लाभ देणारी आहे असं वाटत नाही”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/