मी तर ‘फकीर’, ‘धमक्या’ कुणाला देता ?, चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदम यांच्यावर ‘पलटवार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मी एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहे. काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता ? असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना सोमवारी दिले. कोरोनाच्या संकटकाळात भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कदम यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून हाकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर प्रत्युत्तर देताना, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नये असा टोला विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी आपण फकिर आहोत, आपल्यावर टीका टिप्पणी करण्यापूर्वी विश्वजीत कदम यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी.

सांगलीत पूर आला, त्यावेळी आपण काय केले असा सवाल त्यांनी केला. सध्या संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहे, याचे त्यांनी उत्तर द्यावे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. संकटाच्या वेळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून त्यांची हाकालपट्टी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.