‘अनिल देशमुखांनी बोलताना 100 वेळा विचार करावा’, भाजपा आमदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील काही आयपीएस,आयएएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांचं नाव घेतात तेव्हा आपण काय बोललं पाहिजे याचे भान ठेवलं पाहिजे असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, गृहमंत्र्यांच्या बुद्धीची किव येते, गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करताना 100 वेळा विचार करावा, ज्या अधिकाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत त्या महिला आहेत. कोणत्याही महिला अधिकाऱ्याचा अपमान करणे योग्य नाही. शरद पवारांकडून गृहमंत्र्यांनी क्लासेस घ्यावेत. संजय राऊतांनीच घरचा आहेर दिला ते बरं झालं असंही लाड म्हणाले.

भाजप आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार

युतीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण आणलं, पण हे सरकार मराठा आरक्षण टिकवण्यात असमर्थ ठरलं, या गोष्टीचा सरकारनं विचार केला पाहिजे, भाजप राजकारण करणार नाही. मात्र, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे. मराठा आरक्षण होईपर्यंत भाजप गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले होते अनिल देशमुख ?

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा खुलासा केला होता. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहेत जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

मग नेत्यांचा काय उपयोग ?- संजय राऊत

गृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खासदार संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करु लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग ? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही, काही अधिकाऱ्यांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सागू शकतील असं संजय राऊत म्हणाले.