पालघरमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढणार भाजपचा ‘हा’ नेता

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेकडून महाराष्ट्रातील इतर जागांची उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र, पालघरच्या जागेची उमेदवारी अद्याप गुलदस्त्याच ठेवण्यात आली आहे. आता पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर भाजपाचे राजेंद्र गावित निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. पालघर लोकसभा जागेवर येत्या २४ तासात निर्णय घेणार अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूकीत साताऱ्यातील लोकसभा जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट देण्यात आले अशीच परिस्थिती पालघर लोकसभा मतदार संघात होणार असे दिसते आहे. भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना शिवसेना नरेंद्र पाटीलांप्रमाणे दत्तक घेणार असून जागा जरी शिवसेनेच्या वाटेला आली असली तरी उमेदवार मात्र भाजपाचा असणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या नेत्याने दिली आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन चिंतामण वनगा यांच्या नावाचे भावनिक कार्ड चालणार नाही. योग्य उमेदवार न दिल्यास हातची जागा जाईल. या विचाराने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता युती होण्यापूर्वी पालघरवरून एकमेकांवर चिखलफेक करणारे एकमेकांचा प्रचार करतील ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पालघरच्या जागेवरील उमेदवाराची घोषणा येत्या काहीच तासातच करण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी व्यक्त केली आहे.