लखनऊच्या वजीरगंज कोर्टात स्फोट, अनेक वकील जखमी, 2 जिवंत बॉम्ब सापडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज न्यायालयात देशी बॉम्बचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटात अनेक वकील जखमी झाले आहेत. जखमी वकिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयात दोन जिवंत बॉम्ब देखील सापडले आहेत. बार असोसिएशनचे एक पदाधिकारी असलेले संजीव लोधी यांच्यावर हा बॉम्ब हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात संजीव लोधी मात्र बचावले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील संजीव लोधी यांच्या दिशेने हा देशी बॉम्ब फेकण्यात आला होता परंतु सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले. दोन गटातील संघर्षाचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक स्फोटाचा आवाज झाल्याने न्यायालयात सगळीकडे खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

न्यायालयात पिस्तुल दाखवले
संजीव लोधी हे लखनऊ बार असोसिएशनचे सहाय्यक सचिव आहेत अशी माहिती सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष आदेश सिंह यांनी दिली. त्यांच्याच चेंबरसमोर तीन बॉम्ब फेकण्यात आले होते. या तीन बॉम्बपैकी एक बॉम्ब फुटला. तर दोन जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले. या हल्लावेळी हल्लेखोरांना पिस्तुले दाखवली. संजीव लोधी यांचे असोसिएशनचे सचिव जितेंद्र यादव उर्फ जीतू यांच्याशी वाद होते असे सांगितले जात आहे, जीतू आणि त्याच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.