शाळेतील धड्याचा आदर्श घेऊन 13 जणांचे प्राण वाचविणार्‍या झेनला ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय शौर्य पुरस्कारची घोषणा आज करण्यात आली. देशातील एकूण 22 जणांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यात 12 मुली तर 10 मुले आहेत. महाराष्ट्रातील दोघे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मुंबईतील झेन सदावर्ते ही मुलगी तर औरंगाबादच्या आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मुंबईतील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून दोन वर्षांपूर्वी झेन हिने 13 जणांचा जीव वाचवला होता. झेनने आग भडकलेली असताना प्रसंगावधान दाखवून शाळेत शिकवलेल्या धड्याचा उपयोग केला. आज याच झेनला वीर पुरस्कार जाहीर झाला आहे.

झेनला शाळेत शिकवले होते की आगीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. यामुळे गुदमरून मृत्यू होऊ शकतो. या दरम्यान तोंडावर ओले कापड ठेवल्यास त्रास होत नाही. याच माहितीच्या आधारे तिनं आगीत अडकलेल्या 13 जणांचे प्राण वाचवले.

औरंगाबादचा आकाश खिल्लारे देखील शौर्य पुरस्काराने सन्मानित होईल. त्याने 5 वर्षांच्या मुलीसह तिच्या आईचा जीव वाचवला होता. आकाश शाळेत जात असताना माय-लेकी नदीत बुडत असल्याचे त्याने पाहिले आणि जीवाची पर्वा न करता त्याने या माय-लेकीला वाचवले होते.

या माय-लेकी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा मुलगी पाण्यात बुडाली म्हणून आईने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली होती, मात्र त्यात आई देखील बुडायला लागली. हे आकाशने पाहिले आणि त्याने नदीत उडी मारुन दोघींना सुखरुप बाहेर काढले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन वीर बालकांचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा –