५०० रुपयाची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन- रजा रोखीचे बिल मंजुरीसाठी ५०० रुपयाची लाच स्विकारताना राज्या राखीव पोलीस बल गट क्र.६ धुळे येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास करण्यात आली.

रणवीर सिंग देवलाल सिंग राजपूत (वय- ५४) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीने धुळे लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

रणविरसिंग राजपूत याने तक्रारदार यांना रजा रोखीचे बिल मंजुरीसाठी ५०० रुपयांची लाच मागीतली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.६) पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी पथकाने सापळा रचून राजपूत याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर आणि पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.