निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवडणूक निरीक्षक ब्रज मोहन कुमार यांनी आज दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्य़ालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ब्रज मोहन कुमार बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-पाटील, नोडल अधिकारी उपस्थित होते.

आयोगाने आदर्श आचारसंहिता पालन व्हावे या दृष्टीकोनातून विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्या सूचनांनुसार निवडणूक निर्भय मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडावी. निवडणूक आयोगापर्य़ंत प्राप्त तक्रारींवर तक्ररादरांना तात्काळ प्रतिसाद देऊन तक्रारींचा निपटारा करावा. मतदानपूर्व आणि मतदानानंतर कारवायाची सर्व कामे वेळेत व नियोजनपूर्वक करावीत. पोलिस प्रशासनाने उत्सव, सण आणि जयंती व निवडणूक आदींबाबत पूरक पोलिस बंदोबस्त ठेवावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असे नियोजन करावे.

मतदान केंद्रांवर संपर्क व्यवस्था, वीज आणि पाण्याबरोबरच महिला आणि दिव्यांग मतदारांना आवश्यक व्यवस्था, सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी कार्यवाही पार पाडावी. मतदारांना मतदान करताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांबाबतही जागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.