लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदार राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -(मल्हार जयकर) – अखेर काँग्रेसचा पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार जाहीर झाला. मोहन जोशी यांना ही उमेदवारी जाहीर झालीय. पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं सतत काँग्रेसचाच खासदार निवडून येत असे. फक्त एकदाच समाजवादी काँग्रेसच्या छुप्या पाठींब्यानं भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. त्यानंतर जनता पक्षाची लाट, आणि नरेंद्र मोदींची लाट या काळातच विरोधीपक्षाचे खासदार निवडून आले. कोणतीही लाट नसेल आणि सरळ जरी लढत झाली तर काँग्रेसचाच खासदार निवडून येतो. हे सिद्ध झालंय. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसला सक्षम नेतृत्वच लाभलेलं नाही. राहुल गांधींची आक्रमकता, प्रियांका वाद्रा यांचं पक्षांत झालेलं आगमन यामुळं कार्यकर्त्यांत सध्या उत्साह संचारलाय. त्यामुळेच उमेदवार जाहीर झाला नसतानाही प्रचार कार्यकर्त्यांनी सुरू केलाय! कार्यकेत्यांनी विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. इच्छुकांमध्ये प्रामुख्यानं अभय छाजेड, प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे यांची नावं घेतली गेली. दरम्यान भाजपचे राज्यसभेतले सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी थेट राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसच्या वतीनं लोकसभा लढविण्याचा चालविलेला प्रयत्न, यामुळं सध्या तरी या चौघांची नावं चर्चेत होती, पण पक्षश्रेष्ठींनी मोहन जोशींना उमेदवारी दिलीय.

काँग्रेसपक्ष आणि शहराच्या राजकारणावर स्वातंत्र्योत्तर काळात बाबुराव सणस यांचं वर्चस्व होतं. त्यानंतर पक्षाची आणि महापालिका राजकारणाची सूत्रं ही शिवाजीराव ढेरे यांच्याकडं आली त्यांच्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे ती आली. त्यांनी प्रकाश ढेरे यांना नेमून आपलं राजकारण शहरांत केलं. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं सुरेश कलमाडी यांनी उचल खाल्ली आणि पक्षाचा ताबा घेतला. त्यांनी त्यावर जबरदस्त वर्चस्व गाजवलं. यावेळी मोहन जोशी कलमाडी यांच्यामागे भक्कमपणे उभे होते. कॉमनवेल्थ प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर कलमाडी यांना पक्षातून निलंबित केलं गेलं. शहरातला काँग्रेस पक्ष विस्कळीत झाला, नेतृत्वहीन बनला. तो आजतागायत सुस्थिर झालेला नाही. गटबाजींनी पोखरलेली काँग्रेस असंच त्याचं स्वरूप राहिलं आहे. सध्याचे शहराध्यक्ष हे कलमाडी यांचे खंदे समर्थक असले तरी ते गतवैभव पक्षाला अद्याप मिळालेलं नाही. मोहन जोशींच्या उमेदवाराने काँग्रेस भवनात पुन्हा ‘जान’ आलीय. सारी मरगळ उडून गेलीय.

मोहन जोशी हे शहराच्या राजकारणात एक वजनदार नाव आहे. युवक काँग्रेसचा साधा कार्यकर्ता ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचा प्रांताध्यक्ष अशी त्यांची गाजलेली कारकीर्द आहे. जनता पक्षाच्या राजवटीत प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या मोटारीसमोर रस्त्यावर आडवं पडून केलेलं आंदोलन, याच काळात समाजवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेलं काँग्रेस भवन महिलाध्यक्षा ऍड. शालिनी राणे यांच्या मदतीने काँग्रेस भवनाचा ताबा इंदिरा काँग्रेससाठी जोशींनी घेतला त्यामुळं काँग्रेस भवन हे काँग्रेसकडं राहीलं. अशी अनेक आंदोलनं जोशींनी केली आहेत. सतत कार्यकर्त्यांत वावरणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून २००८ ते २०१४ दरम्यान त्यांनी काम केलं आहे. शिवाय दिल्लीतील अनेक वरिष्ठांशी त्यांचे संबंध आहेत. मोहन जोशींनी विठ्ठल तुपे, प्रदीप रावत या तिरंगी लढतीत रावतांचा विजय झाला असला तरी काँग्रेसचे उमेदवार म्हणून दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन जबरदस्त लढत दिलेली आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.

शहर लोकसभा मतदारसंघात मोहन जोशी-गिरीश बापट अशी सरळ लढत होईल. गेली अनेक वर्षे भाजपची शहरात अडीच लाख मतं ही त्यांच्या हक्काची होती. मोदी लाटेत त्यात दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळं इथं भाजपची उमेदवारी ज्याला मिळेल तो निवडून येण्याची शक्यता असल्यानं भाजपत इच्छुकांची संख्या मोठी होती. पण पुण्याची खासदारकी खेचून आणून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करू अशी काँग्रेसी कार्यकर्त्यांची जिद्द आहे.