मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली का ? ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राजस्थानमध्ये काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले. पायलट यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची जरोदार चर्चा सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मी फक्त शिवसेनेवर टीका केली. त्याचा पक्ष विरोधी कारवाईशी काय संबंध ? असे सांगतानाच मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का ? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करून त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईवर परखड मत व्यक्त केलं आहे. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी हायकमांडकडे केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांशी संबंधित भूखंड घोटाळ्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. त्यामुळे माझ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेविरोधात बोलणं ही पक्ष विरोधी कारवाई होऊ शकते का ? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का ? अशा प्रश्नांचा भडिमार निरुपम यांनी ट्विटद्वारे केला आहे. त्याच्या या भूमिकेमुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

sanjay

दरम्यान, संजय निरुपम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्ष विरोधी वक्तव्य करत असून त्यांनी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर देखील ते सतत टीका करत आहेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी निरुपम यांच्या या पक्ष विरोधी कारवयांचा एक अहवाल तयार करून हायकमांडला पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सुत्रांनी सांगितलं.

यावर बोलताना संजय निरुपम यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, आपले ट्विट्स किंवा वक्तव्य पक्ष विरोधातील आहेत, असे आपल्याला वाटत नाही. महाविकास आघाडी स्थापन करू नये हे माझं पहिल्या दिवसांपासूनचं मत आहे. आताही सरकारमध्ये काँग्रेसची काही भूमिका नाही. सर्व काम शिवसेना आणि राष्ट्रवादीच करत आहे. गेल्या सहा महिन्यात सरकारमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच दिसून आलेलं नाही. संपूर्ण पक्षच क्वारंटाईन झाला आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.