2000 रुपयाची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – आरोपपत्र लवकर पाठवण्यासाठी आरोपीच्या वडिलांकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना शहरातील संजयनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (दि.14) सकाळी करण्यात आली. संतोष बाळकृष्ण फडतरे असे लाच घेताना रंगेहाथ पडकण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या मुलावर मारामारीचा गुन्हा दाखल असून या गन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी आणि गुन्ह्यात आरोपपत्र लवकर पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे फडतरे याने दोन हजार रुपयाची लाच मागितली.

तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुपच प्रतिबंधक विभागाने लाचेची पडताळणी केली असता फडतरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी फडतरे याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोनच दिवसापूर्वी व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडून पैसे वसूल करणाऱ्या पोलिसाला पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी निलंबित केले होते. आत रविवारी याच पोलीस ठाण्याकडील पोलिसाला लाच घेताना पकडण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले यांच्यासह पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.