PPE किट साठी होतो चीनवर अवलंबून, आता भारत करणार 50 लाख सुट निर्यात, सरकारनं दिला ‘ग्रीन’ सिग्नल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाला तेव्हा वैयक्तिक सुरक्षा साहित्य म्हणजे पीपीई किटसाठी संघर्ष करणारा भारत आता महिन्याला 50 लाख पीपीई सूट परदेशात निर्यात करणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. मेक इन इंडियाला बळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. स्थानिक उत्पादनांवर भर देण्याचं आवाहन केलं जात असताना आता मेक इन इंडिया उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवली जाणार आहेत. कोरोनाविरोधात लढा देताना फ्रंटलाईन वर्कर्ससाठी पीपीई किट अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट अविभाज्य घटक आहे. या किटमध्ये सूटसोबतच गॉगल, फेस शिल्ड, मास्क, हेड कव्हर आणि शू कव्हर यांचा समावेश होतो. दरम्यान, पीपीई सूट निर्यात केला जाणार असला तरी या किटमधील इतर वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी मात्र कायम राहणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.

महिन्याला निर्यातीसाठी 50 लाखांची मर्यादा ठरवण्यात आली आहे. व्यापार नोटीसमध्ये पात्रता वेगळ्या पद्धतीने जाहीर केली जाणार आहे. या निकषांमध्ये बसणाऱ्या नियातदरांसाठी निर्यात परवाना जाहीर केला जाईल, असं वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातच आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. या कोरोनाच्या काळात पीपीई सूटची निर्यात ही आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पडलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. कारण भारत स्वत:ची गरज पूर्ण करून एवढ्या मोठ्या प्रमाणात पीपीई कीट निर्यात करणार आहे.