मुस्लिमांसाठी भारत ‘स्वर्ग’, ‘इथं’ त्यांचे अधिकारी सुरक्षित, मोदी सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचं विधान

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. यातच तबलीगी जमातीचे प्रकरण असो किंवा पालघर मधील मॉब लिंचिंगचा प्रकार, काही जणांकडून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार मधील मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावर भाष्य केले आहे त्यांनी म्हंटले आहे की ,” भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित आहेत”.

धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द राजकीय फॅशन नसून भारतीयांसाठी “परिपूर्ण पॅशन”

इस्लामिक देशांच्या गटाच्या टिपण्णीवर प्रतिक्रिया देताना नक्वी म्हणाले की, “धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द” ही “राजकीय फॅशन” नसून भारत आणि भारतीयांसाठी “परिपूर्ण पॅशन” आहे. या सर्वसमावेशक संस्कृती आणि दृढ वचनबद्धतेमुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला विविधतेतील एकतेच्या धाग्यात बांधला आले आहे. अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक, धार्मिक हक्क ही भारताची घटनात्मक व नैतिक हमी आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या “विविधतेतील एकता” चे सामर्थ्य कमकुवत होऊ शकत नाही.

कोरोनाशी एकत्र लढा देऊया…

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण दक्षतापूर्वक एकत्रित होऊन समाजात दुही माजवणाऱ्या अशा शक्तींच्या प्रचाराला पराभूत केले पाहिजे. फेक न्यूज पसरवणारे, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. या प्रकारची षड्यंत्र रचणे आणि कोरोनाविरुद्ध देशातील सामूहिक युद्ध दुर्बल होऊ देता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत. केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की, देशातील सर्व मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था आणि भारतीय मुस्लिम समाज यांनी २४ एप्रिलपासून रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहून एकत्रितपणे प्रार्थना, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

धार्मिक कार्यक्रमात नियम पाळण्यासाठी जागरूकता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३०हून अधिक राज्य वक्फ बोर्डांच्या लोकांनी पवित्र रमजान महिन्यात धार्मिक, सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी लॉकडाऊन, कर्फ्यू, सामाजिक अंतर प्रभावीपणे पाळण्यासाठी आणि लोकांना स्वतःहून प्रार्थना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य वक्फ बोर्डाने मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था, मुस्लिम समाज आणि स्थानिक प्रशासनासह काम करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे. जगातील बहुतेक मुस्लिम राष्ट्रांनीही रमजानमधील मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवर असलेल्या गर्दीच्या कार्यांवर बंदी घातली आहे आणि घरी नमाज, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्ये पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचाही उल्लेख नक्वी यांनी केला आहे.