Coronavirus : दिलासादायक ! ‘कोरोना’वर मात केल्यानंतर मुंबईतील 1000 पोलिसांनी केली ड्युटी ज्वाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या संकट काळात पोलीस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. त्यामुळे पोलीस दलातही कोरोना संसर्गाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात मुंबई पोलीस दलातील ३७ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर बंदोबस्तावर असलेल्या मुंबईतील २,६०० पोलिसांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. आतापर्यंत उपचारानंतर १,९१९ पोलिसांनी या संसर्गावर मात केली असून, १ हजार १३ पोलीस पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

पोलीस कुटुंबीयांसाठी गृहमंत्र्यांची घोषणा
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना संसर्ग विरोधातील लढाईत जीव गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ६५ लाखांच्या आर्थिक मदतीबरोबर, संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या वयापर्यंत कुटुंबीयांना त्याच घरात राहण्याची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. म्हणून अनेकवेळा घरातील कर्त्या माणसाच्या निधनानंतर निवारा गमवाव्या लागणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

रक्षणकर्त्यांवर हल्ले सुरुच
कायदा, सुवव्यस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ले करण्यात येत आहेत. शुक्रवारी पर्यंत राज्यात पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी २८३ गुन्हे नोंद केले असून, आतापर्यंत ८५८ जणांना अटक करण्यात आली आहे.

२४ तासांत १६ पोलिसांना बाधा,
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १६ पोलिसांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. तर १,००७ पोलिसांवर उपचार सुरु असून, ३ हजारांहून अधिक पोलिसांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. दरम्यान, मुंबईत बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) ९३ जणांना कोरोना संसर्गाची बाधी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये ६ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.