राज्यात आठवडयाभरात उन्हाचा पारा वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हैराण केलं असताना, येत्या आठवड्याभरात राज्यात उन्हाचा कडाका वाढणार आहे.मध्यभारत तसेच महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागात येत्या आठवड्यात तापमान वाढ होणार असून, कमाल तापमान पारा ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

दरम्यान, मागील काही आठवड्यात तापमानाचा पारा खाली गेला होता.तसेच दोन आठवडे झाले राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होणार असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

मागच्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला होता. गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा , बुलढाणा, चंद्रपूर राज्यातील या जिल्हात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.