Coronavirus : वुहानमध्ये बस गाडया कार्यान्वीत, ‘लॉकडाऊन’ 8 एप्रिलला संपणार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारतासह जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. या व्हायरसचे संक्रमण जिथून सुरु झाले त्या वुहानमध्ये आज बुधवारपासून बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. वुहानमध्ये ९ आठवडे लॉकडाऊनमुळे शहर बससेवा ठप्प होती.

यादरम्यान चीनमध्ये कोरोना व्हायरसची ४७ नवीन प्रकरणे दाखल झाली असून ही ती प्रकरणे आहेत, जे दुसऱ्या देशातून चिनी नागरिक किंवा इतर परदेशातून चिनी आले आहेत. त्यामुळे संक्रमणाची दुसरी लाट येईल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

हुबेईतून चीनने मंगळवारी तीन महिन्यांचा लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. यात ५ कोटी ६० लाख लोकं आले होते. पण हुबेईची राजधानी वुहानमध्ये ८ एप्रिलला लॉकडाऊन हटवले जाणार असून येथे १ कोटी १० लाख लोकं राहतात.

हुबेई आणि वुहानमधून कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आलेले नाही, पण अगोदरच्या रुग्णांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल हेल्थ कमिशननुसार, चीनमध्ये एकूण ३,२८१ मृत्यू झाले आहेत. चीनने बुधवारी म्हटले की, देशातून मंगळवारी देशांतर्गत संक्रमणाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. कोरोनाची जी ४७ नवीन प्रकरणे मंगळवारी दाखल झाली आहेत, ती बाहेर देशातून आलेल्या चिनी किंवा परदेशी नागरिकांची आहेत.

चीनमध्ये मंगळवारी एकूण ८१,२१८ प्रकरणे समोर आली असून यात ३,२८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. ४,२८७ जणांवर अजून उपचार सुरु असून ७३,६५० जणांना बरे झाल्यावर डिस्चार्ज दिला गेला आहे. १३४ लोकं व्हायरसने संक्रमित असल्याचा संशय आहे.