Coronavirus : ‘कोरोना’ला हरवण्यासाठी केजरीवाल यांचा 5T प्लॅन, 1 लाख लोकांची होणार ‘रॅपिड’ टेस्ट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  दिल्लीत कोरोनाला रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने ५ टी प्लॅन बनवला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, ५ टी मधील पहिला टी आहे टेस्टिंग, दुसरा ट्रेसिंग, तिसरा ट्रीटमेंट, चौथा टीम वर्क आणि पाचवा आहे ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग. त्यांनी म्हटले की, आपल्याला कोरोनाला हरवण्यासाठी या प्लॅनवर काम करावे लागेल.

१. टेस्टिंग

सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही मोठ्या स्तरावर टेस्टिंग करू. दक्षिण कोरियाप्रमाणेच आपणही मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करणार आहोत. पूर्वी टेस्टिंग किटची समस्या होती. पण आता सुधारली आहे. आम्ही ५० हजार लोकांच्या चाचणीसाठी किटची मागणी केली आहे. एक लाख लोकांच्या रॅपिड टेस्टसाठी किट मागविण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून रॅपिड टेस्ट किटची आवक सुरू होईल. कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात रॅपिड टेस्टिंग केली जाईल.

२. ट्रेसिंग

केजरीवाल म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आम्ही शोधत आहोत. सर्व लोकांना सेल्फ क्वारंटाइनसाठी पाठवले जात आहे. ट्रेसिंगसाठी आम्ही पोलिसांची मदत घेत आहोत. पोलिसांच्या मदतीने आम्ही अशा लोकांना शोधून काढू, जे होम क्वारंटाइन आहेत. आम्ही आतापर्यंत पोलिसांना २७२०२ लोकांचे फोन नंबर दिले आहेत. त्यांचे जीपीएस लोकेशन चेक केले जात आहे. यासह मरकजमधून बाहेर पडणार्‍या २००० लोकांचे फोन नंबरही पोलिसांना दिले जातील. त्यांच्या लोकेशनच्या आधारे भागांना सील केले जाईल.

३. ट्रीटमेंट

केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आतापर्यंत ५२५ कोरोना प्रकरणे नोंदवली गेली असून आतापर्यंत दिल्लीत सुमारे ३ हजार खाटांची क्षमता तयार केली आहे. एलएनजेपी, जीबी पंत, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्याद्वारे खासगी रुग्णालयात सुमारे ४०० खाटांची जागा राखीव करण्यात आली आहे. कोरोनाची प्रकरणे जसजशी वाढत चालली आहेत तसतसे आम्ही अधिक रूग्णालयांना कोरोना हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करू. यासह हॉटेल व धर्मशाळा देखील टेकओव्हर केल्या जातील.

४. टीम वर्क

सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले की, कोरोना एकट्याने बरा होऊ शकत नाही. आज सर्व सरकार एक टीम म्हणून काम करत आहेत. सर्व राज्य सरकारांनाही एकत्र काम करावे लागेल. सर्व सरकारे आणि विभागांनी एकत्र होऊन एका टिमसारखे काम केले पाहिजे. सर्व राज्य सरकारांनाही एकमेकांकडून धडा घ्यावा. या टीमचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डॉक्टर आणि नर्स. प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे.

५. ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग

केजरीवाल म्हणाले की, सगळ्या गोष्टींना ट्रॅक करणे सर्वात आवश्यक आहे. सगळ्या प्लॅनला ट्रॅक करण्याची जबाबदारी माझी आहे. जेव्हा आपण कोरोनापासून तीन पावले पुढे राहिलो, तेव्हाच आपण त्याला हरवू शकतो.