तरी देखील इरफान पठाणवर नेटकर्‍यांची ‘जहरी’ टीका !

पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेकांकडून एकमेकांना मदतीचा हात दिला जात आहे. त्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्यांपासून ते खेळाडूपर्यंतचा सहभाग आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत केली आहे. आजी-माजी खेळाडू, व्यवसायिकही सध्याच्या काळात भरघोस मदत करत आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान आणि युसूफ पठाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींच्या अन्नधान्याची सोय केली आहे. त्यांनी 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे पठाण बंधूंनी दान केले आहेत. याआधीही दोघा भावडांनी गरजू व्यक्तींना मोफत मास्कचे वाटप केले होते. मात्र या सर्व मदतकार्यानंतरही इरफानला सोशल मीडियावर काही नेटकर्‍यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नउ वाजता सर्व देशवासियांना घरातले दिवे बंद करुन दिवा लावायला सांगितला होता. संपूर्ण देशभरात लोकांनी याला चांगला प्रतिसादही दिला. परंतु काही भागात लोकांनी नियमभंग करत रस्त्यावर येत फटाके फोडले. इरफानने याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केल्यानंतर, त्याला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. इरफानने काही स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

त्यानंतर अनेक नेटकर्‍यांनी पठाणचा समाचार घेत जहरी टीका केली. इरफान आणि युसूफ हे भाऊ आपल्या वडिलांच्या नावाने सामाजिक संस्था चालवतात. देशभरात सर्व महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा यावर कधी नियंत्रण मिळवतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, पठाण बंधूंव्यतिरीक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.