देवेंद्र फडणवीस यांनी ’ठाकरे सरकार’ कोसळणार म्हणणार्‍या भाजप नेत्यांचे टोचले कान

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –   ठाकरे सरकार कोसळणार, असे म्हणणार्‍या भाजपच्या नेत्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भाजप नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच पुन्हा भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा करत होते. या नेत्यांना आता खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच फटकारले आहे.

महाविकास आघाडीचे लवकरच विसर्जन होणार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असे सातत्यानं भाकीत करणार्‍या स्वपक्षीयांचे स्वत: फडणवीसांनी आज कान टोचले आहेत.

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे, आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यानंतर आज खासदार गोपाळ शेट्टी यांनीही भाजपचे देवेंद्र फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे भाकीत केले होते. त्यामुळे अनेकांचे भुवया उंचावल्या. त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा? हे असे वक्तव्य करणार्‍यांशी चर्चा करून ठरवणार आहे, असा टोला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वकीयांना हाणला आहे.

दहिसर येथील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात देवेंद्र फडणवीस बोलत होते. एवढंच नव्हे तर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना गदा भेट दिली. त्यावर याचा प्रहार केवळ कोरोनाच्या लढाईसाठी करणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या आमच्यासाठी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाविरुद्धच्या लढाई महत्वाची आहे. सत्तेत येणं हा गौण भाग आहे, असे सांगत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

कोरोना काळात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलंय. हे सरकार लवकरच जाईल, असा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांच्यासह भाजपचे इतर नेते वारंवार करत होते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनीच कान टोचल्यानंतर तरी हे नेते याबाबतचे भाष्य करणं टाळणार का?, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.