‘ज्या पक्षाला अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टिका केली आहे. महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडं आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार असा बोचरा टोला फडवीसांनी लगावला आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसच्या भावी अध्यक्षावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राज्यातील नेतेही आपली मते मांडत आहेत. राज्यातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यांनी यापुढे जाऊन, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास सत्ताही सोडू, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरु आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी रहायचं नाहीए. पण त्यांनाच रहावं लागतंय. जे अध्यक्ष पदाविषयी ठरवू शकत नाहीत, ते पुढचं काय ठरवणार ? इतक्या मोठ्या पक्षाची ही अवस्था का झाली याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महविकास आघाडीच्या सरकार बद्दल बोलायचे झाल तर सकरारमध्ये प्रचंड अंतर्विरोध आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चाललंय, तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. शेवटी ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती नैसर्गिक नाही. अशी आघाडी देशाच्या राजकारणात जास्त काळ चाललेली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.