गुजरातमध्ये सर्वाधिक अमली पदार्थ तर महाराष्ट्रात दारु जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकीचा प्रचार सुरु झाला की पैशांचा खेळ सुरु होतो. निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर आत्तापर्यंत दीड हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशांचा महापूर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

आचारसंहिता लागल्यापासून देशाच्या वेगवेगळ्या भागात छापे मारून दीड हजार कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. या जप्तीच्या कारवाईत सर्वाधिक रोख रक्कम आणि सोने तामिळानाडूत जप्त केली आहे तर सर्वाधीक दारु महाराष्ट्रात आणि सर्वाधिक अंमली पदार्थ गुजरातमध्ये पकडण्यात आले आहे.

छापेमारीत एकूण ३५६ रुपयांची रोकड, ३०० कोटी रुपयांचे सोने आणि ६९६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि १५० कोटी रुपयांची दारु पकडण्यात आली आहे. सर्वाधिक किंमतीचा मुद्देमाल गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पकडण्यात आला आहे. देशात सर्वाधिक दारू महाराष्ट्रात पकडण्यात आली आहे.

तामिळनाडू राज्यात १२१ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. त्या खालोखाल आंध्र प्रदेशमध्ये ९५ कोटी तर उत्तर प्रदेशात २२ कोटी रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. महाराष्ट्रात १८ कोटी ३७ लाख लिटर दारु पकडण्यात आली आहे, तर गुजरातमध्ये सर्वाधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडण्यात आले आहे.