आश्चर्यजनक ! माजी पोलीस महासंचालकांचे मत भलत्यालाच ?

कारवाईच्या भीतीने तक्रार करण्यास नकार

गुवाहाटी : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (दि.२३) पार पडले. आसाममध्येही मतदान पार पडले असून यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसामचे माजी पोलीस महासंचालक यांच्याच बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आसामचे माजी पोलीस महासंचालक हरेकृष्ण डेका यांनी ज्या उमेदवाराला मत दिले होते त्या उमेदवाराला मत दिल्याची व्हीव्हीपॅटमधून पावती आली नाही. व्हीव्हीपॅटमधील पावतीवर त्यांचे मत दुसऱ्याच उमेदवाराला गेल्याचे त्यांना दिसले.

डेका यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या बाबतीत घडलेल्या घटनेचा तपशील लिहिला आहे. डेका यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार करणार नसल्याचेही सांगितले आहे. कारण तक्रार खोटी निघाली तर तक्रारदाराविरुद्धच कारवाई होते. त्यामुळे आपण या प्रकारात तक्रार करणार नसल्याचे डेका यांनी सांगितले. डेका यांनी फेसबूकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, आत्तापर्यंत सातत्याने ईव्हीएम मशिनच्या वापराचा पुरस्कार केला होता, मात्र कालच्या घटनेनंतर माझं मत बदललं आहे. ईव्हीएम प्रमाणेच गडबडीबाबत तक्रार करणाऱ्यांची तक्रार खोटी ठरल्यास केल्या जाणाऱ्या कारवाईबाबतही चिंता व्यक्त केली आहे. अशा कारवाईमुळे तक्रार करायला कोणी पुढे येईल का अशी शंका त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

मतदानाच्या पूर्वी देखील विरोधकांनी अनेकदा ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड केली जाऊ शकते असा आरोप केला आहे. मात्र, तो सिद्ध होऊ शकलेला नाही. काल मुंबईमध्ये विरोधकांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ईव्हीएम मशिन ही रशियावरुन नियंत्रित केली जाते असा आरोप केला होता.

deka