आमदारांच्या ‘बांधावर’च्या भेटी ठरताहेत ‘दिखावू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आमदारांचा शपथविधी न झाल्याने त्यांना आमदार म्हणून अजून अधिकार प्राप्त झाला नाही. असे असताना प्रमुख चारही पक्ष आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याचा आदेश देत आहे. मात्र, या भेटी केवळ दिखाऊ ठरत आहे. केवळ शेतकऱ्यांचे काय नुकसान झाले हे ऐकून घेण्याशिवाय या आमदारांच्या हाती काही नाही आणि आमदारांच्या कानावर गाऱ्हाणे घातले तरी त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होण्याची शक्यता दिसत नाही. बांधावर जाण्याऐवजी केंद्रीय मदत कशी लवकरात लवकर मिळेल, यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहे. दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता दौरे सुरु केले आहे. शरद पवार यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काय केले पाहिजे, याचा अनुभव आहे. केवळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काहीही उपयोग नाही, याची त्यांना चांगली जाणीव असणार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय पथक राज्यात भेटीसाठी येईल, असे आश्वासन दिले होते. हे केंद्रीय पथक लवकरात लवकर येऊन राज्याला केंद्रीय मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने दिल्लीत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्यपालांची भेट घेऊन त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आदेश काढण्याची मागणी करण्याची आवश्यकता आहे. पण ते न करता राजकीय नेते शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन वांझुट्या चर्चा करीत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होण्याची अजिबात शक्यता नाही.

Visit : Policenama.com