Coronavirus : परदेशातून पुण्यात आल्यानंतर क्वारंटाईन न झालेल्या महिलेविरूध्द पहिला FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – परेदशातून पुण्यात आल्यानंतर क्वारंटाईन न होणाऱ्या महिलेविरुद्ध शहरातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनुजा महादेव हाके (रा. अलंकापुरी सोसायटी, पौड रस्ता, कोथरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी राजेंद्र दुर्गाप्पा गायकवाड (वय ३७, रा. वडगाव बुद्रूक) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा मस्कत परदेशातून मुुंबईत आल्या होत्या. त्यानंतर अनुजा विमानाने पुण्यात दाखल झाल्या. परदेशातून आल्यानंतर त्यांनी मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे आवश्यक होते.

मात्र, त्या थेट कोथरुड परिसरातील त्यांच्या घरी राहण्यास गेल्या. तत्पुर्वी त्यांना घरालगत असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होण्याची सूचना प्रशासनाने केली होती. मात्र, तरीही त्या क्वारंटाईन न होता घरी राहिल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील हा पहिला गुन्हा असून, यापूर्वी जिल्ह्यात देखील प्रशासनाने एक गुन्हा दाखल केला आहे.