‘केजरीवालांची ‘फुकट’ योजना महाराष्ट्रात नको’ : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक मंत्र्यांनी लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावला आहे, असा आरोप अजित पवारांनी केलाय. अजित पवारांनी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना याबाबत धारेवर धरलं आहे. नितीन राऊत यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याचा विचार असल्याचं सांगितलं होतं. त्याबाबत त्यांनी MSEDCL ला तीन महिन्यात अहवाल देण्याचा आदेश देखील दिला होता.

तसेच ते म्हणाले होते की, लोकांना १०० नाही तर २०० युनिट्सपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. दिल्लीत केजरीवाल यांनी राबविलेल्या योजना महाराष्ट्रातही राबविल्या जातील असा त्यांचा विचार होता. मात्र त्यांच्या या योजनेला अजित पवारांनी मोडीत काढत नापसंती दर्शविली आहे. अजित पवारांनी सांगितले की ही योजना व्यवहार्य नसून अशा लोकप्रिय घोषणा करणे टाळायला हव्यात, अशा शब्दांत त्यांनी नितीन राऊतांच्या या महत्वाकांक्षी योजनेला नाराजी दर्शवत त्यांना फटकारले आहे.

तसेच अजित पवार म्हणाले की, नवीन आर्थिक बोजा पेलण्याची आजमितीला राज्याची क्षमता नाही, त्यामुळे अशा योजना सध्या तरी व्यवहार्य ठरणार नाहीत. म्हणून अशा घोषणा टाळाव्यात आणि विशेष म्हणजे लोकांना मोफत देण्याची सवय लावणं ही काही चांगली बाब नाही. राज्यात अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद असून त्यांच्या या मताला महत्वाचं मानले जात आहे.

दरम्यान दिल्लीचा विचार केला तर दिल्लीत केजरीवालांनी अनेक योजना आणल्या आणि त्यांची अंमलबजावणी देखील केली. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा लोकांनी प्रचंड पसंती देऊन त्यांना निवडून दिले. असे असले तरी दिल्ली आणि महाराष्ट्रात खूप तफावत आहे, कारण दिल्ली हे छोट राज्य असून दिल्लीचे मॉडेल महाराष्ट्रात चालणार नाही. आजमितीला वीज मंडळ हे पूर्णपणे डबघाईला आले आहे. आणि अशा परिस्थितीत फुकट वीज दिली तर वीज मंडळावर थोडेथाकडे नाही तर तब्बल १० हजार कोटी इतका बोजा पडेल असा अंदाज अधिकाऱ्यांनी लावला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच व्यवस्थित संवाद होत नसल्याचे उघड झाले आहे.