मोठा दिलासा ! ‘DL’, वाहनाचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, ‘PUC’ सह ‘या’ कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत मोटार वाहनांशी संबंधित फिटनेस, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), प्रदूषण प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे लोकांना वाहनाची मुदत संपणार्‍या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी बराच वेळ मिळेल. सोप्या शब्दात सांगायचे तर मोटार वाहनाशी संबंधित तुमची कोणतीही कागदपत्र कालबाह्य झाली आहेत किंवा होणार आहेत, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत त्याचे नूतनीकरण करू शकता. एवढेच नव्हे तर सरकारने तुमच्या कालबाह्य ड्रायव्हिंग परवान्याची वैधताही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे.

यापूर्वीही दोनदा वाढवला आहे वैधता कालावधी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनमध्ये आदेश काढला होता की, कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट आणि इतर कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यानंतर जूनपर्यंत परिस्थिती सुधारली नाही, तर सरकारने पुन्हा हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मंत्रालयाने एक आदेश जारी केला की, कालबाह्य होणारी कागदपत्रे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वैध मानली जातील. आता तिसऱ्यांदा सरकारने ही मर्यादा डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे.

१ फेब्रुवारी किंवा त्यानंतर कालबाह्य झालेल्या कागदपत्रांची वाढली वैधता

केंद्र सरकारने संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही ठिकाणी, कार्यालयात गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी अजूनही लॉकडाऊन आणि कलम १४४ लागू आहे. अशा परिस्थितीत कागदपत्रांचे नूतनीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी लोक कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, १ फेब्रुवारी २०२० रोजी कालबाह्य होणारी किंवा आतापासून ३१ डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणारी मोटार वाहन कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध मानली जातील.