‘महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सुरु झालेल्या चळवळीतून जन्म झालेल्या आणि आता देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान मिळविलेली शिवसेना आता तिसरा आणि ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने देत आहे. एक छायाचित्रकार, मृदू भाषी, समोरच्याचे ऐकून घेणारा युवा नेता ते एक भक्कम आणि एकदा ठरवले तर ते पार पाडण्यासाठी काहीही करायला तयार असलेला राजकारणी असा सर्व आतापर्यंतचा उद्धव ठाकरे यांचा प्रवास महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे.

आता ते राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. ५९ वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. नव्वदच्या दशकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याअगोदर ते सामना हे शिवसेनेचे मुखपत्र राज्यभरात पोहचविण्यासाठी काम करत होते. सामना महाराष्ट्रात भक्कम करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नव्हता़ एक उत्तम छायाचित्रकार म्हणून त्यांची त्यावेळी सर्वत्र ओळख होती.

 

मुंबई महानगरपालिकेच्या १९८५ च्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराच्या आखणीत महत्वाची भूमिका निभावली. तरीही ते राजकारणात प्रवेश करतील, असे कोणाला वाटत नव्हते. त्यावेळी राज ठाकरे यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच व्यक्तीमत्व, त्यांच्यासारखीच भाषणाची स्टाईल यामुळे युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत होता.

१९९७ आणि २००२ मध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेने विजय मिळविला. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुढे येऊ लागले होते. त्यामुळे राज ठाकरे नाराज होते. २००३ मध्ये महाबळेश्वर येथे शिवसेनेचे अधिवेशन झाले. त्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव मांडला़ आणि तेथून बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून त्याचां प्रवास सुरु झाला.

मुंबई आता मराठी माणसाची राहिलेली नाही. त्यामुळे मुंबईत आपला पाया भक्कम करायचा असेल तर, वर्षानुवर्षे राहणारे आणि आता महाराष्ट्रीयन झालेल्या परप्रांतीयांना आपलेस केले पाहिजे, हे उद्धव ठाकरे यांनी ओळखले व त्यासाठी ‘मी मुंबईकर’ ही मोहिम सुरु केली. त्याला चांगले समर्थनही मिळू लागले होते. मात्र, शिवसेनेचे उत्तराधिकारी म्हणून स्वप्न पाहणारे राज ठाकरे यांना उद्धव यांच्या या प्रयोगाला यश मिळत असल्याचे पाहून राज ठाकरे अस्वस्थ होत होते. युवा सेनेच्या माध्यमातून कल्याण रेल्वे स्टेशनवर परिक्षेसाठी आलेल्या परप्रांतीयांना पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली. त्याचे पडसाद देशभर उमटले आणि उद्धव ठाकरे यांची पहिलीच मोहीम मी मुंबईकर त्यात वाहून गेली.

शिवसेनेत बंड करु पाहणारे नारायण राणे यांना शिवसेनेने बाहेरची वाट दाखविली. त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी बंड करुन स्वतंत्र मनसेची स्थापना केली. त्यानंतरच्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने पहिल्याच फटक्यात १२ जागा जिंकल्या. आता राज ठाकरेचा मनसे हा ठाकरे यांचा खरा उत्तराधिकारी ठरणार असे बोलले जाऊ लागले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तुलना केली जाऊ लागली. तरीही उद्धव ठाकरे शांत होते. त्यात २०१२ साल उद्धव यांच्यासाठी खूप संघर्षाचे गेले. त्यांना ह्दयविकाराच्या धक्क्याला सामोरे जावे लागले. लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर बायपास झाली. त्यातून सावरत असतानाच बाळासाहेब ठाकरे यांचे ७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. त्यातून स्वत: व शिवसेनेला सावरत त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळवून दिल्या. त्यानंतर त्यांचा संघर्ष खऱ्या अर्थाने सुरु झाला.

केंद्रात भाजपाला बहुमत मिळाले तरी सर्वात जुना सहकारी असलेल्या शिवसेनेला त्यांनी एकाच अवजड उद्योग या खात्यावर बोळवण केली. त्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजपाने युती तोडली. ऐनवेळी भाजपाने दगा दिला तरी उद्धव ठाकरे यांनी राज्यभर एकहाती प्रचार करुन स्वत:च्या बळावर शिवसेनेला ६३ जागा मिळवून दिल्या. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने भाजपाने सुरुवातीला राष्ट्रवादीच्या मदतीने बहुमत सिद्ध केले. पण, पाच वर्षे सरकार चालविण्यासाठी शेवटी भाजपाला शिवसेनेला बरोबर घ्यावे लागले. तरीही भाजपाने केंद्रात आणि राज्यात कायमच दुय्यम वागणूक दिली. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुका आल्या.

तेव्हा भाजपाला शिवसेनेची गरज वाटू लागली. त्यातून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीतून युती करण्याचे जसे ठरल. तसेच हीच भेट राज्यातील निवडणुकीनंतर युती तुटायला कारणीभूत ठरली.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री करु असे बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिल्याचे सांगत होते. ते अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीमुळेच असा त्यांच्या प्रचाराचा रोख होता. मतमोजणी नंतर भाजपाचा जागांचा फुगा फुटला व शिवसेनेशिवाय आपण सरकार बनवू शकत नाही, हे लक्षात आले. त्याच वेळी शिवसेनेला आपला मुख्यमंत्री करण्याची संधी असल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितले.

पण असे काही बोलणे झालेच नाही, असे सांगत भाजपाने मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. या महिन्याभरात उद्धव ठाकरे यांच्यावर असंख्य वेळा दडपण आणण्यात आले. शिवसेना फुटेल, हिंदुत्व, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणे म्हणजे आत्मघात अशी अनेक प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न झाला. तरीही डगमगून न जाता त्यांनी बाळासाहेबांना आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले आहे, या एकाच वाक्यावर ठाम राहिले. त्याचा परिणाम आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत.

राज्यापुढे अनेक समस्या आहेत. पण, उद्धव ठाकरे यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहिला तर, त्यांनी एखादी गोष्ट ठरविली तर त्यावर ते ठाम राहतात, हे आतापर्यंत वेळोवेळी दिसून आले आहे. राज्यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या या ठामपणाचा ते कसा उपयोग करुन घेतात, हे यापुढे पहायला मिळणार आहे.

Visit : Policenama.com