साखर कारखान्यात नोकरी लागली म्हणून पगाराच्या आकड्यांसह मित्रांनी केली ‘बॅनर’बाजी !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची महाराष्ट्रात ओळख आहे. खासगी आणि सहकारी कारखान्यांची मोठी उलाढाल सोलापूर जिल्ह्यात होते. सोलापूर जिल्ह्यातील एका युवकास साखर कारखान्यात नोकरी लागल्यानंतर तेथील तरुणांनी चक्क बॅनरबाजी करतच अभिनंदन केलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ (सिना) येथील एका युवकाला साखर कारखान्यात नोकरी मिळाली. विशेष म्हणजे चांगल्या हुद्द्यावर 5 आकडी पगार देखील त्याला आहे. या तरुणाच्या मित्रांनी डिजिटल बॅनर झळकावून त्याचं अभिनंदन केलं आहे. विशाल बारबोले असं या तरुणाचं नाव आहे.

विशालनं 10 वी उत्तीर्ण होऊन आयटीआयचा कोर्सही केला होता. पिंपरीतील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल नोकरीला लागला. त्यानं अनेक वर्षे काम केलं. परंतु तिथं मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता. अशात नोकरीच्या शोधात असताना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटरपदी विशालला नोकरी मिळाली. यानंतर मित्रांनाही आनंद आवरला नाही. त्यांनी डिजिटल बॅनर लावत विशालचं अभिनंदन केलं.

साखर कारखान्यात 14500 रुपये प्रतिमहिना नोकरी मिळाल्यानंतर मित्र परिवारानं ही बॅनरबाजी केली आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर साधारण आपण अशी बॅनजरबाजी बघतो. हे असं फक्त सोलापूरातच घडू शकतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.