राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये पैसे गुंतविणार्‍यांसाठी मोठी बातमी, जाहीर झाले नवीन नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत c(एनपीएस टियर-२) आयकर बचत योजनेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नव्या नियमांनुसार, केवळ एनपीएस टियर-२ योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनाच आयकरमध्ये सवलत मिळणार आहे. यामध्ये मिळणारी सवलत एनपीएस टियर-१ योजनेंतर्गत मिळणाऱ्या इन्कम टॅक्स लाभापेक्षा वेगळी आहे. सोप्या शब्दांत, केंद्रीय कर्मचार्‍यांना एनपीएस टियर-१ आणि टियर-२ या दोन्ही अंतर्गत मिळणाऱ्या आयकरात सूट मिळण्याचा लाभ मिळेल.

एनपीएस टियर-२ खात्यातून तीन वर्षापर्यंत नाही काढता येणार पैसे

एनपीएस टियर-२ खात्यात दिलेल्या योगदानावर आयकर सवलतीचा लाभ फक्त सरकारी कर्मचार्‍यांनाच मिळेल. केंद्र सरकारचे कर्मचारी एनपीएस टियर-२ खात्यात वर्षाकाठी केल्या जाणाऱ्या १.५० लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावर तीन वर्षांपर्यंत कोणतीही रक्कम काढू शकणार नाहीत. म्हणजे गुंतवणूकीचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे. मात्र एनपीएस ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस पैसे काढू शकतो.

कर्मचाऱ्याच्या तीन एनपीएस खात्यातील एकाच असेल लॉक-इन कालावधी

एनपीएस टियर-२ योजनेंतर्गत करात सूट मिळवण्यास इच्छुक असलेल्या केंद्रीय कर्मचार्‍याची तीन एनपीएस खाती असतील. पहिल्या टियर-१ मध्ये अनिवार्य खाते असेल. दुसरे टियर-२ मध्ये एक पर्यायी खाते असेल, ज्यातून पैसे स्वतंत्रपणे काढता येतील. तर तिसरे खाते एक टियर-२ पर्यायी खाते असेल. त्याचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा असेल. त्यात कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळेल. एनपीएसमध्ये दिलेल्या योगदानावर सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना आयकर लाभ मिळतो.

एखाद्या आर्थिक वर्षात सवलत रक्कम १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी

एनपीएस टियर-१ खात्यात दिलेल्या योगदानावर आयकर कायद्याच्या कलम ८०सीसीडी (१बी) अंतर्गत ५०,००० रुपयांची सूट मिळते. ही सवलत कलम ८०सीसीडी (१) अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावर देण्यात येणाऱ्या सवलतीपेक्षा वेगळी असते. येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कलम ८०सी, ८०सीसीसी (विमा कंपनीने दिलेल्या पे-पेंशन योजनेत गुंतवणूक) आणि कलम ८०सीसीडी (१) (एनपीएस) अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीची रक्कम एखाद्या आर्थिक वर्षात १.५ लाख रुपये पेक्षा जास्त नसावी.

एनपीएस ग्राहकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी काढू शकतो पैसे

एखाद्या एनपीएस ग्राहकाने एप्रिल २०२० पासून नवीन आयकर स्लॅबचा पर्याय निवडल्यास कलम ८०सीसीडी (१बी) अंतर्गत मिळणारी ५०,००० रुपयांची विशेष सवलत किंवा कलम ८०सीसीडी (१) अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट आणि कलम ८०सी अंतर्गत मिळणारी सूट लागू होणार नाही. जर करदात्याने नवीन आयकर स्लॅब निवडला नाही, तर जुना आयकर नियम लागू होईल. तुम्ही नवीन आयकर स्लॅब निवडल्यास कर्मचार्‍याच्या एनपीएस खात्यात कंपनीच्या योगदानावर आयकर सवलतीसाठी दावा करू शकता.