इंदापूर : ट्रॅक्टर ट्राॅलीसह 5 एकर ऊस जळून खाक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील उजणी धरणालगत असणार्‍या हिंगणगावमधील शेतात ऊस तोडणी सुरू असलेल्या ऊसाच्या फडाला आग लागल्याने पाच एकर ऊसासह ट्रॅक्टर व दोन ट्रॉली शेतात जागेवर जळून खाक झाल्याची मोठी घटना शुक्रवार (दि. २९ नोव्हेंबर) रोजी घडली आहे.

ओल्या दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याच्या दारात आता दुष्काळात तेरावा आल्याने संबंधीत शेतकर्‍यावर मोठे संकट ओढवले आहे.

हिंगणगांव येथिल केशर उत्तम मोरे यांच्या अडीच एकर शेतात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू आहे. शुक्रवार (दि. ३ नोव्हेंबर) रोजी तिसरी ऊसाची खेप भरण्यासाठी नामदेव शेंडगे यांचे वाहन फडात आले होते. मात्र काही समजण्याच्या आतच काही विपरित घडले आणि क्षणार्धातच उस तोडणी सूरू असलेल्या फडातून आगीचे मोठ मोठे लोट बाहेर पडू लागले.

याच ऊसाच्या फडात ऊस वाहतुकदार नामदेव शेंडगे यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर दोन ट्राॅलीसह ऊस भरण्यासाठी उभा होता. ऊस फडाला लागलेली आग एवढी प्रचंड होती की यात ट्रॅक्टर व दोन ट्राॅली यांची आगीत जळून अक्षरश: राख झाली. ऊसतोड मजूरांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरत होता. दरम्यान, इंदापूर नगरपालिकेतील अग्निशमन विभागास कळविल्यानंतर तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमक गाडी आग लागलेल्या स्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेजारील ऊसाच्या फडाला आग लागुन आणखी मोठे नुकसान झाले असते. मात्र या आगीच्या तांडवात ऊस वाहतूकदार ज्ञानदेव दामू शेंडगे यांचा स्वराज्य ट्रॅक्टरची अक्षरशा राख झाली असून कारखान्याकडून शेंडगे यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सध्या संपुर्ण राज्यात ऊसतोड हंगाम जोरात सुरु आहे. शेकडो मैलावरुन जीव टांगनीला लावून मजूर हे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या भागात काम करत असतात. आग कोणत्या कारणाने लागली याबाबतचे कारण जरी अद्याप अस्पष्ट असले तरी यात मोठे नुकसान झाले आहे.

Visit : Policenama.com